जेएनएन, मुंबई: मुंबई महानगरपालिकेत नवनियुक्त नगरसेवकांची गट नोंदणी प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाकडे जात असतानाच, आता पक्ष कार्यालयांच्या वाटपासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीत मिळणाऱ्या पक्ष कार्यालयांना मोठे राजकीय महत्त्व असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.

शिवसेना UBTचा पालिकेला पत्रव्यवहार
2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेले मोठे पक्ष कार्यालय पुन्हा मिळावे, यासाठी शिवसेना UBTकडून पालिका प्रशासनाकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संख्याबळात घट झाली असली, तरी पूर्वीच्या वाटपाचा आधार घेत शिवसेना UBTने आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप–शिवसेना शिंदे गटाचीही हालचाल
दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्याप एकत्रित गट नोंदणी पूर्ण झालेली नसतानाही पक्ष कार्यालयासाठी पालिकेकडे अर्ज सादर केला आहे. जर भाजप–शिवसेना शिंदे गटाची एकत्रित गट नोंदणी झाली, तर संख्याबळाच्या आधारे महायुतीला महापालिकेतील सर्वात मोठे पक्ष कार्यालय मिळण्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात आहे.

संख्याबळाचे गणित काय सांगते?

महापालिका निवडणुकीत

• भाजप – 89 नगरसेवक

    • शिवसेना (शिंदे गट) – 29 नगरसेवक

    • शिवसेना (UBT) – 65 नगरसेवक असे संख्याबळ आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आल्यास, त्यांचे एकूण नगरसेवक 118 होतील. त्यामुळे महापालिकेतील संख्याबळानुसार होणाऱ्या पक्ष कार्यालय वाटपात महायुतीचा दावा सर्वाधिक मजबूत ठरणार आहे.

    वादाची शक्यता वाढली
    पक्ष कार्यालयांचे वाटप हे संख्याबळाच्या आधारे केले जाते. मात्र शिवसेना UBTने आपल्या पूर्वीच्या कार्यालयावर दावा केल्यामुळे, तसेच महायुतीकडून त्याच कार्यालयासाठी प्रयत्न सुरू असल्याने, या मुद्द्यावरून राजकीय वाद आणि आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    पालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
    या संपूर्ण प्रक्रियेत पालिका प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आणि नियमांच्या चौकटीत राहून कोणत्या पक्षाला कोणते कार्यालय दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांचा प्रभाव आता थेट पक्ष कार्यालयांच्या वाटपावर दिसू लागला असून, येत्या काळात या मुद्द्यावर राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

    हेही वाचा: Akola Mayor: अकोल्याच्या महापौरपदी शारदा खेडकर विराजमान; 13 मतांनी दणदणीत विजय

    हेही वाचा: NCP President Post: एनसीपी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक लवकरच;राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग