जेएनएन, मुंबई: गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी व वायुप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने उत्सव आणि मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांवर या निर्देशांचा थेट परिणाम होणार आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्स, अत्यंत तीव्र प्रकाशाचे बीम आणि तत्सम प्रकाशयंत्रणांच्या वापरावरही निर्बंध आहेत.

ध्वनिक्षेपक, डीजे आणि साउंड सिस्टीमचा वापर करताना निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. साउंड सिस्टीममध्ये साउंड लिमिटर असणे आणि ध्वनीची पातळी तपासण्यासाठी डेसीबल मीटरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ध्वनीमर्यादा ओलांडल्यास संबंधित उपकरणे किंवा वाद्ये जप्त करण्याची कारवाई होऊ शकते.

ध्वनिक्षेपक वापरणाऱ्या गणेश मंडळांकडून एक लाख रुपयांची सुरक्षा ठेव घेण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम जप्त केली जाऊ शकते. व्यक्तींसाठी ५० हजार रुपयांच्या सुरक्षा ठेवीची तरतूद आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यास अडथळा निर्माण करणे हा उद्देश नसून, उत्सवाच्या काळात नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये मंडळांना उत्साहासोबत नियमांचेही काटेकोर पालन करावे लागणार आहे.