जेएनएन, मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपने पुढील दोन महिन्यांचा आराखडा तयार केला असून कार्यकर्त्यांना टार्गेट दिले आहे. भाजपने कार्यकर्त्यांना जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचे टार्गेट दिले आहे. पुढील निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांना अलर्ट मोडवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यकर्त्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन स्थानिक लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचे आणि त्या लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या आधीच कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह राहून लोकांची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांमार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू करत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने ही तयारी सुरू केली आहे. भाजपकडून राज्य सरकार आणि केंद्राच्या अनेक लोकापयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वॉर्डनिहाय याद्या तयार करून प्रत्येक व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क साधण्याचे अभियान लवकरच भाजप सुरू करणार आहे. भाजपने राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी आणि तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.