जेएनएन, मुंबई: लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्राकडे पहिले जाते. समाजात घडणाऱ्या घटना, नागरिकांवर होणाऱ्या अन्याला वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्राद्वारे पत्रकार करत असतो. निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करत असतो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात अनेक वृत्तपत्रे चावली जातात. इंग्रजी, हिंदी, मराठी,  बंगाली सर्वच भाषांमध्ये वृत्तपत्रे चालवली जायची. मराठीतील पहिले वृत्तपत्र मात्र 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केले होते. 'दर्पण' नावाचे हे वृत्तपत्र त्याकाळी इतके प्रसिद्ध झाले होते की, या वृत्तपत्राची दाखल इंग्रज गांभीर्याने घेत असत. बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी, 1812 मध्ये झाला. मराठीतील आद्य पत्रकार म्हणून, बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते.

अतिशय अभ्यासू वृत्तीचे असलेले जांभेकर यांनी लहान असताना घरीच वडिलांकडून मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. पुढचा अभ्यास मात्र त्यांनी मुंबईत केला.  रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान व गणित व ज्योतिषी विषयात पारंगत असलेले जांभेकर यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच  बाळशास्त्री जांभेकर यांची  मुंबईच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शिक्षण अधीकारी असताना जांभेकरांनी  निरनिराळ्या विषयांवरील पाठ्यपुस्तके तयार करण्याचे त्यांनी केले होते. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनी लिहिली. मराठी भाषेत शून्यलब्धी हे पहिले पुस्तकही त्यांनी  लिहिले. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यावरचे त्यांनी लिहिलेले शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते.

दर्पण वृत्तपत्र

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्रात 6 जानेवारी रोजी "मराठी पत्रकार दिन" साजरा केला जातो. भारतातील नागरिकांना देशातील सद्य परिस्थिती आणि जगभरातील ज्ञान माहिती व्हावे यासाठी हे वृत्त पत्र सुरु करण्यात आले होते. वृत्तपत्रातील बातम्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळाव्या म्हणून, दर्पण वृत्तपत्राचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत छापला जात असे. हे वृत्तपत्र केवळ नागरिकांच्या प्रबोधन आणि मनोरंजन करण्याच्या दृष्टीने काढले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत म्हणजे आठ वर्षे सुरु होते. या वृत्तपत्राचा शेवटचा अंक 26 जानेवारी 1840 प्रसिद्ध झाला होता. कुठलेही वृत्तपत्र चालविण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, त्यासाठी वृत्तपत्रात जाहिराती दिल्या जातात त्यामार्फत वृत्तपत्र छपाईचा खर्च निघू शकेल परंतु बाळशास्त्री जांभेकरांनी शेवट्पर्यंत दर्पण वृत्तपत्रात एकही जाहिरात छापली नाही. आठ वर्षे हे वृत्तपत्र त्यांनी स्वखर्चाने चालवले. या वृत्तपत्रात मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषांमध्ये बातमी असायची मराठी बातमी लेखनाची जबाबदारी भाऊ महाजन यांची तर इंग्रजी बातमी लेखनाची जबाबदारी जांभेकर यांची असायची. या वृत्तपत्राचे 300 वर्गणीदार होते. दर्पण वृत्तपत्राची दाखल सर्वत्र घेतली जायची. त्यावेळी चालणाऱ्या इंग्रजी, हिंदी, बंगाली वृत्तपत्रांमध्ये दर्पण मधील लेख छापले जायचे.

(Image source: Internet)