जेएनएन, नाशिक: भोंदूबाबा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एसआयटीच्या तपासात खरातचे पतसंस्थांमधील व्यवहार, बेनामी मालमत्ता आणि आर्थिक जाळे उघडकीस येत असून, प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
100 हून अधिक खात्यांमध्ये खरात ‘नॉमिनी’
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, शिर्डी परिसरातील विविध पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावाने उघडलेल्या 100 हून अधिक खात्यांमध्ये अशोक खरात हा नॉमिनी म्हणून नोंदवण्यात आला होता. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, या खात्यांचा वापर करून काळा पैसा फिरवला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
समता आणि जगदंबा पतसंस्थांवर लक्ष
या प्रकरणात समता आणि जगदंबा या दोन प्रमुख पतसंस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संबंधित पतसंस्थांना पत्र पाठवून सर्व खात्यांची आणि व्यवहारांची सविस्तर माहिती मागवली आहे.
‘चाकणकर’ नावाचं खातं
तपासादरम्यान एका खात्यात ‘चाकणकर’ नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली. मात्र, या प्रश्नावर अशोक खरातने उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याची माहिती समोर आहे. या नावामागे नेमका कोण आहे, याचा तपास सुरू असून, या धाग्यामुळे आणखी मोठा आर्थिक घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
70 कोटींची बेनामी मालमत्ता
एसआयटी तपासात धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 4 वर्षांत सुमारे 70 कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, अनेक मालमत्ता इतरांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.
सर्व व्यवहार रोख पैशांत
तपासात असेही आढळले की, खरातने बहुतांश व्यवहार रोख पैशांत केले आहेत. अधिकृत हिशोब नसल्याने आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडणे आव्हानात्मक ठरत आहे. मात्र, त्याच्या मोबाईलमधून जप्त करण्यात आलेल्या डेटामधून महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
सावकारीतून जमिनी हडप?
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, खरात सावकारी करत होता आणि कर्जाच्या नावाखाली अनेकांची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा संशय आहे. या व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे.
हेही वाचा: Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई: पत्नी कल्पना खरातविरोधात लुकआऊट नोटीस जारी
