जेएनएन, मुंबई. Maharashtra Day: संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यांनतर 1 मे 1965 पासून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी भाषा असेल तेव्हापासून दरवर्षी 1 मे रोजी मराठी राजभाषा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. परंतु अनेक नागरिकांमध्ये संभ्रम असतो की, राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिवस यात 27 फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा केला जातो. आज 1 मे रोजी संपूर्ण राज्यात मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे.
महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठीला राजभाषेचा दर्जा राज्याच्या स्थापनेवेळी देण्यात आलेला नव्हता. त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित केला. 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964' नुसार "महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल" असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले. पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव उपक्रम हाती घेतले. राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडण्यात आली. मराठी भाषेचा सर्वांगाने परिचय करून देण्यासाठी “राज्यभाषा परिचय” हे पुस्तक तयार केले गेले. मराठी भाषेचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले.
मराठी भाषा गौरव दिन
मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "27 फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.
