पीटीआय, मॉस्को. Vladimir Putin On India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. क्रेमलिनकडून या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. तसेच, आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला. रशियन अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींसोबत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली.

पुतिन यांनी स्वीकारले भारतात येण्याचे निमंत्रण

वृत्तसंस्था पीटीआयने क्रेमलिनच्या हवाल्याने सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक उच्चस्तरीय बैठकीसाठी भारतात येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. क्रेमलिनने एका निवेदनात म्हटले आहे, "भारतीय नेत्याने रशियन अध्यक्षांना वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात येण्यासाठी त्यांच्या निमंत्रणाची पुष्टी केली. निमंत्रण कृतज्ञतापूर्वक स्वीकारले गेले."

निवेदनात सांगितले आहे की, त्यांनी रशिया-भारत संबंधांच्या धोरणात्मक स्वरूपावर भर दिला आणि सांगितले की, हे संबंध बाह्य प्रभावामुळे प्रभावित होत नाहीत आणि ते सर्व दिशांनी गतिशीलपणे विकसित होत राहतील.

रशियन अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलणे केले आहे. त्यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला आणि भारतातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.