एएनआय, इस्लामाबाद: भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून (Pakistan) येत असलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली एचक्यू-9 (HQ-9) चे गंभीर नुकसान झाले आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानी हवाई संरक्षणाला ड्रोन हल्ल्यांमध्ये (Drone Attack) मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान, चीनी हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करतो आणि पाकिस्तानकडे 80 टक्क्यांहून अधिक चीनी शस्त्रे आहेत.

भारतीय हवाई दलाची एस-400 सुदर्शन चक्र (S-400 Sudarshan Chakra) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली काल रात्री भारताच्या दिशेने येत असलेला हल्ला लक्षात घेऊन डागण्यात आली. अनेक डोमेन तज्ञांनी एएनआयला सांगितले की, या मोहिमेत पाकिस्तानचे लक्ष्य यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. तथापि, या प्रकरणी अद्याप अधिकृत सरकारी दुजोरा मिळालेला नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानवर आणखी एक हल्ला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सुरू असतानाच हे वृत्त आले आहे. भारताने काल पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) चालवले होते, ज्यामध्ये पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या महासंचालकांनी सांगितले की, हल्ल्यांदरम्यान सहा भागांमध्ये वेगवेगळ्या शस्त्रांनी २४ हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराने भारतीय सशस्त्र दलांचा ड्रोन पाडल्याचा दावाही केला आहे, परंतु या दाव्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.