नवी दिल्ली, रॉयटर्स: KP Sharma Oli Resigns नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी राजीनामा दिला, अशी माहिती त्यांचे सहकारी प्रकाश सिलवाल यांनी दिली. देशात सुरू असलेल्या हिंसक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर आणि लष्कर प्रमुखांनी त्यांना पायउतार होण्याचा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

'Gen-Z' आंदोलनापुढे ओली सरकारने टेकले गुडघे

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये 'Gen-Z' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीने सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन सुरू केले होते. सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाने या आंदोलनाची ठिणगी पडली, पण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि आर्थिक संकट यांसारख्या मुद्द्यांवरून तरुणांमध्ये आधीच मोठा असंतोष होता. सोमवारी हे आंदोलन हिंसक झाले, ज्यात आंदोलकांनी संसद भवनावर चाल केली आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 20 लोकांचा मृत्यू झाला.

या हिंसाचारानंतर पंतप्रधान ओली यांच्यावर मोठा दबाव वाढला होता. मंगळवारी आंदोलकांनी ओली यांच्या खासगी निवासस्थानासह अनेक नेत्यांच्या घरांना आग लावली, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ओली यांनी लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांच्याकडे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करी मदतीची मागणी केली होती. मात्र, लष्करप्रमुखांनी त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, ते पायउतार झाल्यानंतरच लष्कर परिस्थिती स्थिर करू शकेल. यानंतर, ओली यांनी आपला राजीनामा सादर केला.

या आंदोलनामुळे नेपाळमधील राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. ओलींच्या राजीनाम्यानंतर, आता देशात सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आंदोलक तरुणांनी केवळ ओलींचा राजीनामाच नव्हे, तर भ्रष्ट नेत्यांवर कठोर कारवाईची आणि राजकीय पदांसाठी निवृत्तीचे वय निश्चित करण्याची मागणीही केली आहे. या आंदोलनामुळे नेपाळच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.