जेएनएन, मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके अभिनेते ज्यांच्या एकापेक्षा एक भूमिकांनी चित्रपट सृष्टीला वेगळेपण दिले अश्या सर्वांच्या लाडक्या अशोक मामांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. अशोक सराफ यांनी अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत.

जेष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्काराचे देखील वितरण यावेळी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.

राजकपूर जीवनगौरव पुरस्कार 2020 ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी यांना तर सन 2021 साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आला. तसेच राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन 2020 साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन 2021 साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन 2022 साठी विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राजकपूर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन 2020 साठी अभिनेते स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन 2021 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि सन 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व. रवींद्र महाजनी यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र गश्मिर महाजनी यांनी तर श्रीमती उषा चव्हाण यांच्यावतीने विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन 2020 साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन 2021 साठी ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे आणि सन 2022 साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.