जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेल्या रिंकू राजगुरूंच्या आगामी ‘आशा’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज सकाळी निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज करताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठी प्रतिक्रिया उमटताना दिसली.

या चित्रपटात रिंकूने पूर्णपणे वेगळा आणि प्रगल्भ असा लूक साकारला आहे. कठोर वास्तव, संघर्ष आणि आशेचा किरण अशा भावनिक घटकांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना भिडणारी वाटते. ट्रेलरमध्ये नायिकेच्या आयुष्यातील वैयक्तिक संघर्ष, कुटुंबाशी असलेली नाती आणि समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.

रिंकू साकारत असलेली भूमिका अनेक सामाजिक आणि मानसिक आव्हानांशी झुंज देणाऱ्या तरुणीची आहे. आयुष्याच्या अंधाऱ्या प्रसंगांमध्येही आशा न सोडणारे तिचे व्यक्तिमत्व कथेला अधिक ताकद देताना दिसते. कुटुंबीयांमधील नात्यांचे सूक्ष्म पैलू, समाजातील अडथळे आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास ट्रेलरमध्ये प्रकर्षाने जाणवतो. सामाजिक संदेशाने परिपूर्ण आणि भावनिकतेने भरलेला कथेचा क्लायमॅक्स प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे.

चित्रपटात रिंकूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते या कलाकारांच्या भूमिका असून त्यांच्या अभिनयामुळे कथा अधिक प्रभावी झाल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. दिपक पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील आहेत, तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी यांनी सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करणार आहे.

आधी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘आशा’ हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.