जेएनएन, मुंबई: देशाला हादरवून सोडणाऱ्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या घटनांमधील विविध पैलू आणि अनेक न उलगडलेले मुद्दे या कलाकृतींमधून समोर आले. आता या हल्ल्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारणार आहे. तर कसाबविरोधातील खटल्यात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये दोन्ही कलाकारांची झलक पाहायला मिळते.

'प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 26/11 हल्ल्यानंतर अजमल कसाबविरोधातील खटला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात निकम यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले आहे. चित्रपटात राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर आणि तरुण शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

प्रहार कधी प्रदर्शित होणार?
राजकुमार रावचा सत्य घटनांवर आधारित 'प्रहार' हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. ऑगस्ट महिन्यात इतर चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. 'टॉक्सिक' 26 ऑगस्टला, तर श्रद्धा कपूरचा 'इथा' आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'वन' 28 ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. राजकुमारच्या चित्रपटाची पुढील 20 दिवसांतील बॉक्स ऑफिस कामगिरी त्याच्या प्रदर्शनानंतरच कळेल.

हेही वाचा: लावणीसम्राज्ञीच्या नखरेल अदा.. 'ईठा' सिनेमाचं पहिलं पोस्टर अन् टीझर रिलीज, श्रद्धा कपूरचा लुक पाहून चाहते म्हणाले, अप्सरा आली..