जेएनएन, मुंबई: मराठी बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे हा नेहमीच त्याच्या लाइफस्टाइलमुळे आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर शिवचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स असून, विशेषतः शिव आणि त्याच्या आजीचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. दोघांमधील जिव्हाळ्याचे नाते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. अनेकदा मुलाखतींमध्येही शिव आजीला सोबत घेऊन जाताना दिसतो.

मात्र यावेळी शिव चर्चेत आला आहे तो आजीमुळे नाही, तर त्याच्या कथित लग्नामुळे. अभिनेता शिव ठाकरेने गुपचूप लग्न केल्याचा अंदाज वर्तवला जात असून, याची माहिती त्याने वेगळ्याच पद्धतीने सोशल मीडियावर दिली आहे. मात्र त्याचे लग्न नेमके कोणासोबत झाले आहे, ती मुलगी कोण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शिव ठाकरेने लग्नविधी दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये त्याच्या पत्नीची झलक दिसत आहे. या पोस्टला “Finally…” असे कॅप्शन दिल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शिवला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी हे व्हिडीओ एखाद्या शूटिंगचा भाग असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.

शिव ठाकरे खरोखरच लग्नबंधनात अडकला आहे का? त्याची पत्नी कोण आहे, ती काय करते आणि तो तिचा चेहरा कधी उघड करणार? असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात असून, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आता शिवच्या पुढील पोस्टकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: अनुष्का - विराटची मुलगी वामिका झाली 5 वर्षांची, अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिले - 'मी पुन्हा त्या फॉर्ममध्ये आली आहे...'