जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर आधारित भूमिकेत झळकणार आहे. तिचा आगामी चित्रपट ‘आशा’ डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे.

‘बाई अडलीये म्हणून ती नडलीये’ असा प्रभावी संवाद पोस्टरवर दिसून येतो, जो चित्रपटाच्या कथानकाचा सार सांगतो. या चित्रपटात रिंकू आशा सेविकेच्या भूमिकेत दिसणार आहे – ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, महिलांचा संघर्ष आणि त्यांच्या आयुष्याची झुंज या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या कथेत पाहायला मिळेल.

चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप जाधव यांनी केले असून, निर्मिती आनंद पवार यांनी केली आहे. यात साईनकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते आणि दिलीप घारे या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक मान मिळवले आहेत. 61 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘आशा’ने तब्बल चार पुरस्कार पटकावले – सर्वोत्तम अभिनेत्री (रिंकू राजगुरू), सर्वोत्तम सामाजिक चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री. अलीकडेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये ‘आशा’ चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग जागतिक कन्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मंत्री डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते, तसेच सुमारे ५०० आशा व अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या.

‘आशा’ हा चित्रपट ग्रामीण भागातील स्त्रियांच्या संघर्षाची, आत्मविश्वासाची आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची हृदयस्पर्शी कहाणी सांगणार आहे. सामाजिक संदेशासह भावनिक प्रवास अनुभवायला मिळणार असल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा: अक्षय कुमारने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव; न्यायालयाने राखून ठेवला निर्णय