जेएनएन, मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील महत्त्वाचा आगामी चित्रपट ‘उत्तर’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. झी स्टुडिओज आणि जॅकपॉट इंटरटेनमेंट्सची ही संयुक्त निर्मिती 12 डिसेंबर 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये रेणुका शहाणे यांच्या प्रमुख भूमिकेची झलक पाहायला मिळते. गंभीर, भावनिक आणि वास्तववादी भूमिकांमध्ये त्यांचा कसलेला अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. चित्रपटात अभिनय बेर्डेने मुलाची आणि रेणुका शहाणे यांनी आईची भूमिका साकारली आहे. आई मुलांमधील नाते या चित्रपटात रंगविण्यात आले आहे.
चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये रेणुका शहाणे सोबत अभिनय बेर्डे, हृता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत दिसणार आहेत. प्रत्येकाच्या भूमिकेची झलक ट्रेलरमध्ये प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे. कौटुंबिक नातेसंबंध, मतभेद आणि भावनिक ताणतणाव याभोवती फिरणारे कथानक प्रेक्षकांना भावनिक अनुभव देणार असल्याचे संकेत ट्रेलरमधून मिळतात.
या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी क्षितिज पटवर्धन यांनी सांभाळली आहे. त्यांनी याआधी लेखनातून दिलेल्या कामगिरीप्रमाणेच ‘उत्तर’मध्येही एक जबाबदार, वास्तववादी आणि प्रभावी कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
