जेएनएन, मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा प्रेमकथांचा हंगाम रंगणार आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट 2’ या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून, काही तासांतच त्याने सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेला उधाण आले आहे.

ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित या तिघांच्या नव्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या भावनिक प्रसंगांपासून ते हलक्याफुलक्या क्षणांपर्यंत सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं वाटतंय. चित्रपटात लग्न, घटस्फोट आणि पुन्हा समोर आलेले जुने प्रेम — या भावनिक वळणांवर आधारित कथानक दिसतंय, ज्यामुळे नातेसंबंधातील गुंतागुंतीचं चित्रण पाहायला मिळेल, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. ललित, ऋचा आणि रिधिमा या तिघांशिवाय प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या हटके भूमिकाही पाहायला मिळणार आहेत.

‘प्रेमाची गोष्ट 2’ हा चित्रपट येत्या 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनाला गोडवा देणारा ठरणार आहे.