जेएनएन, मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण आज विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मल्याळम सुपरस्टार मोहनलाल  यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या सोहळ्यात मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता आणि वैविध्य सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. ‘शामची आई’, ‘नाळ 2’ आणि ‘जिप्सी’ या चित्रपटांनी मराठी सिनेमाची श्रीमंती अधोरेखित करत विविध श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. 

मराठी चित्रपटांचा गौरव

शामची आई’: साने गुरुजींच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित ‘शामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा रजत कमळ चा पुरस्कार मिळाला. हा  पुरस्कार  चित्रपटाचे निर्माते अमृता अरुण राव व दिग्दर्शक सुजय डहाके यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला.

सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला आणि मराठी चित्रपट मंडळ तसेच साहित्य संमेलन प्रॉडक्शन्स यांनी निर्मित केलेला हा चित्रपट शाम नावाच्या मुलाच्या दृष्टिकोनातून त्याच्या आईच्या प्रेम, त्याग आणि शिक्षणाची भावनिक कहाणी सांगतो. चित्रपटात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर आणि सुनील अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साध्या पण प्रभावी कथानकातून प्रेक्षकांना भावनिक प्रवासात गुंतवणारा हा चित्रपट मराठी साहित्याचा सिनेमातील यशस्वी प्रवास दर्शवतो. समीक्षकांनी चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्र आणि अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे.

नाळ 2’: 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘नाळ’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘नाळ 2’ ने दुहेरी यश मिळवले. आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा सुवर्ण कमळ चा पुरस्कार मिळाला. हा  पुरस्कारआटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांच्यावतीने   विजयकुमार बन्सल यांनी व चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला.  

चैत्या नावाच्या मुलाच्या भावनिक प्रवासाचा पुढील टप्पा दाखवणारा हा चित्रपट आपल्या खऱ्या आईला भेटण्यासाठी गावी गेलेल्या चैत्याला आपली बहीण आणि भाऊ असल्याचे कळण्याची कहाणी सांगतो. 

    याच चित्रपटातील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकले आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार पुरस्कार मिळाला, जो त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला. वऱ्हाडी बोली, ग्रामीण महाराष्ट्राचे नयनरम्य चित्रण आणि आई-मुलाच्या नात्यातील संवेदनशील चित्रण यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचा लाडका ठरला. ‘भिंगोरी’ आणि ‘डराव डराव’ ही गाणी विशेष लोकप्रिय झाली.

    जिप्सी’: श्याम सूर्यवंशी दिग्दर्शित ‘जिप्सी’ मधील कबीर खंडारे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावला, जो त्याने जो त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला. स्मिता तांबे यांच्यासह प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट एका भटक्या समाजातील मुलाच्या जीवनातील संघर्ष आणि स्वप्नांचा शोध घेतो. कबीरच्या सशक्त अभिनयाने चित्रपटाला भावनिक खोली प्राप्त झाली.

    हिंदी चित्रपटातील मराठी योगदान
    ‘सॅम बहादूर’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील तांत्रिक योगदानासाठी मराठी कलाकारांचा गौरव झाला. श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार आणि सचिन लवलेकर यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  सॅम माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेला जिवंत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

    नवोदित दिग्दर्शकाचा सन्मान
    नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्या ‘आत्मपँफ्लेट’ या चित्रपटाला दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा (इंदिरा गांधी) पुरस्कार मिळाला, जो त्यांनी स्वीकारला. वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे आणि अनोख्या मांडणीमुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक झाले.

    हेही वाचा: National Film Awards: मोहनलाल यांच्या भाषणाने जिंकले मन, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याला मिळाले स्टेंडिंग ओवेशन