जेएनएन, मुंबई: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये केवळ दिग्गज कलाकारांचेच नव्हे, तर एका चार वर्षांच्या लहानग्या अभिनेत्रीचेही नाव गाजले. अवघ्या चार वर्षांची त्रेशा ठोसर हिने ‘नाळ 2’ या चित्रपटातील चिन्नीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावत इतिहास घडवला आहे.
कमल हासनला 1960 साली ‘कलथुर कन्नम्मा’ या चित्रपटासाठी केवळ सहा वर्षांच्या वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या काळापासून हा विक्रम अखंड राहिला होता. आता त्रेशा ठोसरने हा विक्रम मोडत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. या कामगिरीबद्दल स्वतः कमल हासन यांनी सोशल मीडियावरून त्रेशाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, “प्रिय मिस त्रेशा ठोसर, तुम्ही माझा विक्रम मोडला आहे. मी 6 वर्षांचा असताना मला माझा पहिला पुरस्कार मिळाला होता. तुम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमच्या अद्भुत प्रतिभेवर काम करत राहा. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांनाही शुभेच्छा देतो.”
कमल हासनच्या या खास पोस्टनंतर चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी छोट्या त्रेशावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “इतक्या लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणे म्हणजे खरंच आश्चर्यकारक आहे. अभिनंदन त्रेशा!” तर दुसऱ्याने म्हटले, “तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठराल.”
राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2025 अनेक कारणांसाठी खास ठरला. अभिनेता शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांनी त्यांचे पहिले राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, तर मल्याळम सुपरस्टार मोहनलालला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या भव्य सोहळ्यातील खरी स्टार ठरली ती लहानशी त्रेशा ठोसर. तिच्या या यशामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय सुरू झाला असून, तिचे नाव आता कमल हासनसोबत एका ऐतिहासिक विक्रमाशी जोडले गेले आहे.
त्रिशाने कमल हसन सोबतच व्हिडीओ कॉलचा क्षण तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ट्रीशाला फोन करून तिचे इतके कौतुक केल्याबद्दल आणि तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल तिचे खूप खूप कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यभर ट्रीशाच्या सोबत राहण्यासाठी सरांचे आशीर्वाद मिळावेत अशी इच्छा आहे. आयुष्यभर टिपून ठेवण्याचा क्षण.