जेएनएन, मुंबई : लोकप्रिय वेब मालिका ‘गुल्लक’ आता नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Sony LIV वर ५ जूनपासून ‘गुल्लक 5’ स्ट्रीम होणार असून मिश्रा कुटुंब पुन्हा एकदा आपल्या रोजच्या आयुष्यातील गमती-जमती, नात्यांतील ऊब आणि भावनिक क्षणांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

या नव्या सीझनमध्ये मिश्रा निवासात बदलत्या काळाची झलक पाहायला मिळणार आहे. घराला नवा रंग, नवीन वाय-फाय कनेक्शन आणि आधुनिक जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारे हे कुटुंब यावेळी वेगळ्या रूपात दिसणार आहे. मात्र घरातील छोट्या-छोट्या क्षणांतील जिव्हाळा आणि आपुलकी कायम तशीच राहणार आहे.

यंदाच्या सीझनमध्ये अन्नू स्वतःला सिद्ध करण्याच्या संघर्षात दिसणार असून महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास यांच्यातील द्वंद्व अनुभवताना दिसेल. अमनही नव्या गोष्टींसह परतणार आहे. दुसरीकडे, “बिट्टू की मम्मी” या नावाने ऑनलाइन लोकप्रिय झालेली शांती अचानक चर्चेचा विषय ठरते. प्रसिद्धीचा आनंद घेत असतानाच ती बदलत्या जगाशी स्वतःच्या पद्धतीने जुळवून घेताना दिसणार आहे.

मालिकेबद्दल बोलताना TVF चे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले की, प्रत्येक सीझनसोबत ‘गुल्लक’ प्रेक्षकांच्या अधिक जवळ गेली आहे कारण मिश्रा कुटुंब प्रत्येकाला स्वतःच्या घरासारखे वाटते. पाचवा सीझन बदल, प्रगती आणि आपल्या मुळांशी जोडून राहण्याच्या भावनेवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.

तर अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी शांतीच्या व्यक्तिरेखेची नवी बाजू यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सांगितले. दैनंदिन आयुष्याचे प्रामाणिक चित्रण हीच ‘गुल्लक’ची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

The Viral Fever निर्मित या मालिकेत जमील खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मायर, सुनीता राजवार, हेली शाह आणि अन्नूच्या भूमिकेत अनंत जोशी पुन्हा एकदा झळकणार आहेत.

    हास्य, घरगुती नोकझोक आणि भावनिक क्षणांनी भरलेली ‘गुल्लक 5’ ही मालिका ५ जूनपासून फक्त Sony LIV वर स्ट्रीम होणार आहे.

    हेही वाचा: Raja Shivaji Box Office Collection:‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; २० दिवसांत केली इतकी कमाई