जेएनएन, मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा सहावा सिझन येत्या 11 जानेवारी 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील सिझनमध्ये अभिनेता रितेश देशमुख यांच्या दमदार होस्टिंगने शोला विशेष लोकप्रियता मिळाली होती. यंदाही रितेश देशमुखच बिग बॉसच्या घराचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.
मागील सिझनप्रमाणेच यंदाचा सिझनही तितकाच धमाकेदार ठरण्याची शक्यता आहे. मात्र, या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या एका प्रोमो व्हिडीओमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रोमोमध्ये तीन संभाव्य स्पर्धक वेगवेगळ्या डान्स परफॉर्मन्सच्या माध्यमातून आपली झलक दाखवत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे संभाव्य स्पर्धकांबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.
प्रेक्षकांच्या चर्चेनुसार, यंदाच्या सिझनमध्ये सोनाली राऊत, करण सोनावणे, राधिका पाटील आणि गुणरत्न सदावर्ते हे चेहरे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या नावांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार, कोणते नवे चेहरे महाराष्ट्राचं मनोरंजन करणार, हे सर्व प्रेक्षकांना शोच्या सुरुवातीलाच कळणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहणार, यात शंका नाही.
हेही वाचा: Masterchef India Season 9: यावेळी वेगळी असेल मास्टरशेफची थीम; भारतातील सर्वात मोठा कुकिंग शो कधी आणि कुठे पाहू शकता? जाणून घ्या
