जेएनएन, मुंबई: नुकताच बिग बॉस मराठीचा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, पहिल्याच आठवड्यात घरात विविध टास्क, मतभेद आणि वादांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. परिचित चेहऱ्यांच्या सहभागामुळे या सिझनकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष असून, सुरुवातीपासूनच घरातील घडामोडींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

दरम्यान, या सिझनमधील पहिलाच ‘भाऊंचा धक्का’ आता रंगणार असून, त्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख स्पर्धक तन्वी कोलतेची तिच्या वर्तनावरून चांगलीच कानउघाडणी करताना दिसत आहेत. घरातील इतर स्पर्धकांशी तिचा संवाद, सतत बोलण्याची शैली आणि वादग्रस्त वागणूक यामुळे बिग बॉसने तिच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळते.

रितेश देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत तन्वीच्या वागण्यावर भाष्य करत, “तू खूप जास्त बोलतेस,” असे सांगत तिचा समाचार घेतला. घरात निर्माण होणाऱ्या तणावपूर्ण वातावरणासाठी केवळ भांडणं करणं पुरेसं नसून, खेळात समतोल आणि शिस्त आवश्यक असल्याचा अप्रत्यक्ष संदेशही त्यांनी दिला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रेक्षकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी तन्वीच्या आवाज आणि वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी “फक्त भांडण केल्याने बिग बॉस जिंकता येत नाही,” अशा शब्दांत तिच्यावर टीका केली आहे. तसेच, घरात इतरही स्पर्धक असून ते शांतपणे खेळत असल्याचे मत काही प्रेक्षकांनी मांडले आहे.

आता तन्वी कोलतेच्या या वागणुकीवर बिग बॉस कोणती कारवाई करणार, तिला कोणती शिक्षा मिळणार की तिला थेट घराबाहेर जाण्याचा धोका आहे, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज प्रसारित होणाऱ्या भाऊंच्या धक्क्याच्या भागात मिळणार असून, त्यामुळे आजचा एपिसोड अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

हेही वाचा: 'माझे घर पाडले, मला धमकी दिली...' बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पराभवावर बोलली कंगना राणौत