जेएनएन, मुंबई: बिग बॉस सिझन ५ चा विनर अभिनेता सूरज आणि संजना यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. सुरजच्या विवाहसोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने तर सुरजची कलवारी म्हणून मान मिळवला. मात्र, सुरजच्या लाडक्या बहीण अभिनेत्री अंकिता वाळवलकर उपस्थित राहू शकली नाही.
सूरजच्या लग्नाची खरेदी करताना अंकिताची उपस्थिती होती, तसेच सुरजच्या केळवणाचे फोटो शेअर करत तिने त्याच्या बायकोचा चेहरा देखील दाखवला होता. सूरज–संजना यांच्या विवाहानंतर अंकिताने सोशल मीडियावर केलेली भावूक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नवविवाहित दाम्पत्याला दिलेल्या शुभेच्छांमध्ये तिने व्यक्त केलेली भावना अनेकांच्या हृदयाला भिडत आहे.
सूरज–संजना यांनी काल कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत अत्यंत पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला. त्यानंतर जवळचे नातेवाईक आणि मित्र सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करत होते. अंकिताची पोस्ट मात्र विशेष लक्ष वेधून घेत आहे.

आपल्या पोस्टमध्ये अंकिताने लिहिले आहे:
"प्रिय सूरज आणि संजना, आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात… एकमेकांचा आधार, माया आणि सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार होते. छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधा आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्यभरे… नवविवाहित जीवनाला हार्दिक शुभेच्छा!"
सूरज आणि संजनाच्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
हेही वाचा: मराठी बिग बॉस 6: सलमानकडून मोठी घोषणा; ‘भाऊंचा धक्का’ पुन्हा रंगणार
