जेएनएन, मुंबई: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीशी जोडली जाणार आहे. प्रियंकाने तिच्या निर्मिती संस्थेच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा सिक्वेल अर्थात 'व्हेंटिलेटर 2'ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, तब्बल 10 वर्षांनंतर ती 'व्हेंटिलेटर'च्या विश्वात परतत असून हा चित्रपट 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रियंका चोप्राने केली 'व्हेंटिलेटर 2'ची घोषणा
प्रियंका चोप्राने 2016 मध्ये 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटातून निर्माती म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स' या निर्मिती संस्थेचा हा पहिला चित्रपट होता. आता या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण होत असताना प्रियंकाने सिक्वेलची घोषणा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

प्रियंकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली. आपल्या निर्मिती संस्थेच्या प्रवासाची आठवण सांगताना तिने अर्थपूर्ण आणि वेगळ्या धाटणीच्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा आपला उद्देश असल्याचे नमूद केले.

तिने पोस्टमध्ये लिहिले की, 10 वर्षांपूर्वी 'पर्पल पेबल पिक्चर्स'ची सुरुवात करताना अर्थपूर्ण कथा सांगण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 'व्हेंटिलेटर' ही टीमसाठी महत्त्वाची कथा ठरली. आता एका दशकानंतर पुन्हा एकदा त्याच प्रवासाला नवी सुरुवात होत आहे.

'व्हेंटिलेटर 2' कधी होणार प्रदर्शित?
'व्हेंटिलेटर 2'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी पुन्हा एकदा राजेश मापुस्कर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते.

प्रियंका चोप्रा, डॉ. मधु चोप्रा आणि राजेश मापुस्कर हे 'पर्पल पेबल पिक्चर्स' आणि 'मॅजिझ पिक्चर्स' या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

    निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्हेंटिलेटर 2' हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटातील कलाकार, कथानक आणि चित्रीकरणाचे वेळापत्रक याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

    काय होती 'व्हेंटिलेटर' चित्रपटाची कथा?
    2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'व्हेंटिलेटर' हा चित्रपट कोकणातील कामकर कुटुंबाभोवती फिरणारा होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य गजानन यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येते. त्यानंतर संपूर्ण कुटुंब रुग्णालयात एकत्र येते.

    या प्रसंगामुळे कुटुंबातील सदस्यांमधील जुने वाद, मतभेद, नात्यांमधील गुंतागुंत आणि अनेक वर्षांपासून मनात साचलेल्या भावना समोर येतात. गंभीर परिस्थिती असतानाही चित्रपटात विनोद आणि कौटुंबिक भावनांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला होता.

    या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सुभा आर्य, विजू खोटे, सतीश आळेकर आणि अच्युत पोतदार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तर प्रियंका चोप्रानेही या चित्रपटात विशेष उपस्थिती लावली होती.

    'व्हेंटिलेटर'ला मिळाले होते तीन राष्ट्रीय पुरस्कार
    'व्हेंटिलेटर' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्यासोबतच राष्ट्रीय स्तरावरही गौरवण्यात आले होते. या चित्रपटाने तब्बल तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले होते.

    दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिक्सिंग या श्रेणींमध्येही चित्रपटाने पुरस्कार मिळवले होते.

    त्यामुळे आता 'व्हेंटिलेटर 2'मधून प्रियंका चोप्रा आणि राजेश मापुस्कर यांची जोडी पुन्हा काय नवा अनुभव घेऊन येणार, याकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

    प्रियंका चोप्राच्या आगामी प्रोजेक्टचीही चर्चा
    दरम्यान, प्रियंका चोप्रा सध्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच एस. एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

    एकीकडे मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये काम करत असताना प्रियंकाने पुन्हा मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याने तिच्या चाहत्यांमध्ये 'व्हेंटिलेटर 2'बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

    हेही वाचा: पिवळ्या साडीतील तो अंदाज पडद्यावर गाजला, पण शूटिंगवेळी रविनाला बसायचा थंडीचा शॉक! ‘कोण होणार करोडपती’मध्ये सांगितला खास किस्सा