जेएनएन, मुंबई : “कॉक्रोच जनता पार्टी” या नव्याने चर्चेत आलेल्या मोहिमेला आता मराठी चित्रपटसृष्टीतूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या आंदोलनाला समर्थन दर्शवले आहे. सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादानंतर “कॉक्रोच जनता पार्टी” नावाची चळवळ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली असून लाखो लोकांनी या पेजला फॉलो केले आहे.
या मोहिमेबाबत समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी या चळवळीचे समर्थन केले असून काहींनी तीव्र विरोधही दर्शवला आहे. अशात हेमंत ढोमे यांनी लोकशाहीत पर्याय आणि प्रश्न विचारण्याची गरज अधोरेखित करत पोस्ट शेअर केली.
ढोमे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “कॅाजपा ला आत्ताच (राजकीय) विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची किव येते… एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात ही आशा सोडलेल्या समाजात जर एक आशेचा किरण दिसतो आहे तर ही सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे.”
पुढे त्यांनी भारतीय राजकारणातील आंदोलनांच्या प्रवासाचा उल्लेख करत, “या आंदोलनाचं पुढे काय होईल हा भाग वेगळा कारण आपल्याकडे बहुतांशी राजकीय आंदोलने पुढे कोणत्या वळणावर गेली हे आपण सगळेच जाणतो. पण लोकशाहीत पर्याय महत्त्वाचा आहे,” असे नमूद केले.
कॅाजपा ला आत्ताच (राजकीय) विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची किव येते…
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 21, 2026
एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात ही आशा सोडलेल्या समाजात जर एक आशेचा किरण दिसतो आहे तर ही सुदृढ लोकशाही साठी अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक अशी बाब आहे. ज्याचं स्वागत माझ्या… pic.twitter.com/PcjDtCbHhN
यासोबतच त्यांनी या मोहिमेचे प्रमुख मानले जाणारे अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत, “आपल्याकडून खूप वेगळ्या अपेक्षा आहेत, आपण जबाबदारीने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल ही प्रांजळ अपेक्षा,” असेही म्हटले आहे.
हेमंत ढोमे यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले असून अनेकांनी त्यांच्या मताला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.
