जेएनएन, मुंबई. यंदाच्या गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’ विसर्जनासाठी तब्बल 33 तास लागल्याने भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली. अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती विसर्जनासाठी चढवताना झालेल्या गोंधळामुळे मिरवणुकीचा वेग मंदावला आणि समुद्रात राजा व तराफा वेगवेगळे असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या प्रसंगावरून सोशल मीडियावर मंडळावर जोरदार टीका झाली. आता मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे यांचे पती मेहुल पै यांनीही कठोर शब्दांत मंडळाला फटकारले आहेत.

मेहुल पै यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “लालबागचा राजा, मंडळ आणि विसर्जनाची एकंदर अपयशता सर्वांसमोर आली. अफाट पैसा, मोठं नाव असूनही व्यवस्थापन शून्य होतं. व्हीआयपींना प्राधान्य, सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान – हेच या मंडळाचं खरं रूप दिसलं. इतकंच नाही तर कोळी बांधवांना दर्शन नाकारून त्यांचा अपमान करण्यात आला.”

ते पुढे म्हणाले, “राजा तो सर्वांचा असतो! अनंत चतुर्दशीला जेव्हा मूर्ती पाण्यात विसर्जनासाठी उभी होती, तेव्हा मंडळाचे कार्यकर्ते नव्हते; तर कोळी बांधव तब्बल 12 तास खंबीरपणे राजासोबत होते. शेवटी रात्री 10 वाजता त्यांच्याच मदतीने विसर्जन पूर्ण झालं. मात्र राजा समुद्रात पाठमोरा उभा असलेला तो क्षण अतिशय वेदनादायी होता.”

आपल्या पोस्टच्या शेवटी मेहुल पै म्हणाले, “धडा असा की आज कर्मही 5जी नेटवर्कवर आहे. त्यामुळे कर्माची फळ लगेच परत मिळतात. लालबागच्या राजाचा विजय असो.” यंदा ‘लालबागचा राजा’ विसर्जनातील व्यवस्थापन, व्हीआयपी संस्कृती आणि भाविकांच्या गैरसोयींमुळे सतत चर्चेत राहिला असून आता मेहुल पै यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.