जेएनएन, मुंबई: मराठी बिग बॉसच्या घरात सध्या खेळ हळूहळू रंगू लागला असून, पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमधील रुसवे-फुगवे, मतभेद आणि किरकोळ वाद पाहायला मिळाले. काही ठिकाणी तीव्र भांडणंही झाली. मात्र, आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने बिग बॉसच्या घरात एक वेगळंच, खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.
आज मकर संक्रांतीचा सण असल्याने सर्व स्पर्धक आपापल्या कुटुंबापासून दूर, बिग बॉसच्या घरातच हा सण साजरा करत आहेत. यानिमित्ताने घरातील किचनमध्ये सर्व बॉईज एकत्र जमलेले दिसले. कोणी जेवण बनवत होते, तर कोणी स्वयंपाकात एकमेकांना मदत करत होते. या दृश्यामुळे घरात एक सकारात्मक आणि आनंदी माहोल निर्माण झाला.
दरम्यान, सागर करंडे आपल्या खास कॉमेडी स्टाईलने सर्वांना हसवत असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या विनोदी कमेंट्समुळे किचनमधील वातावरण अधिकच हलकंफुलकं झालं. सागरच्या या अंदाजाचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘काळू डॉन’ म्हणून ओळखले जाणारे प्रभू शेळके यांनी घरातील सर्व स्पर्धकांना तिळगुळ वाटत सणाच्या शुभेच्छा दिल्या. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असा संदेश देत त्यांनी घरात आनंदाचे वातावरण निर्माण केले. प्रभू शेळके यांच्या या कृतीमुळे घरातील तणाव काही काळापुरता तरी कमी झाल्याचे दिसून आले.
घरातील हे खेळीमेळीचे वातावरण पाहून अनेक स्पर्धकही अवाक झाले. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका प्रेक्षकाने कमेंट करत लिहिले की, “घरातील हे वातावरण जरा वेगळंच आहे.” तर दुसऱ्या प्रेक्षकाने लिहिले, “हे चित्र पाहून बिग बॉसला टेन्शन आलं असेल, आता भांडणं कोण करणार?”
सागर करंडेच्या कॉमेडीचे कौतुक करत एका चाहत्याने लिहिले, “सागरमुळेच शोमध्ये खरी इंटरेस्ट येतेय.” तर प्रभू शेळके यांनी तिळगुळ वाटून सकारात्मक वातावरण निर्माण केल्याबद्दलही प्रेक्षकांकडून त्यांचं भरभरून कौतुक होत आहे.
एकंदरीत, मकर संक्रांतीच्या निमित्ताने बिग बॉसच्या घरात आज वाद-विवादांपेक्षा एकोपा, हास्य आणि सणाचा आनंद पाहायला मिळाला.
हेही वाचा: Laikey Laikaa Poster: रवीना टंडनची मुलगी तिच्या प्रेमकथेने करणार धमाल, लइकी-लइकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
