IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेने दिलेले 271 लक्ष्य भारताने यशस्वी रित्या पूर्ण केले आहे. या सामन्यासह भारताने एकदिवशीय सामन्यांची ही मालिकाही 2-1 जिंकली आहे. भारताकडून यशस्वी जयस्वालने शतकी पारी खेळली. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अर्धशतकीय खेळी केली.
यशस्वी जयस्वालचे शतक (yashasvi jaiswal centuries) (116*) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) (75) आणि विराट कोहली (Virat Kolhi) (65) यांच्या अर्धशतकांमुळे भारतीय संघाने विझाग येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. यासह, टीम इंडियाने कसोटी मालिकेतील पराभवाचा बदलाही घेतला. दोन्ही संघांमधील टी-20 मालिका आता 9 डिसेंबर रोजी खेळवली जाईल.
270 धावांचे लक्ष्य
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 20 सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर नाणे भारताच्या बाजूने पडले. भारतीय खेळाडूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी आनंद व्यक्त केला. दव पडल्याचे लक्षात घेऊन राहुलने जलद गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 47.5 षटकांत 270 धावांवर आटोपला.
भारतीय गोलंदाजांनी संघाला स्वस्तात बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 106 धावा केल्या, जे त्याचे 23 वे एकदिवसीय शतक होते आणि दक्षिण आफ्रिकेच्या या सलामीवीराने अनेक विक्रम प्रस्थापित केले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा अर्धशतक हुकला, त्याने 67 चेंडूत 48 धावा केल्या. सलामीवीर रायन रिकल्टनला पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने धाव न देता बाद केले. इतर फलंदाज: मॅथ्यू ब्रिट्झकेने 24, एडेन मार्करामने 1, डेवाल्ड ब्रेव्हिसने 29, मार्को जॅन्सनने 17, कॉर्बिन बॉशने 9, लुंगी एनगिडीने 1 आणि ओटनील बार्टमनने 3 धावा केल्या.
कुलदीप यादव - प्रसिद्ध कृष्णाचा ‘चौकार’
केशव महाराजने नाबाद 20 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी केली. कुलदीपने 10 षटकांत 41 धावा देत चार विकेट्स घेतल्या, तर कृष्णाने 9.5 षटकांत 66 धावा देत चार विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.
रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20000 धावा
271 धावांचा पाठलाग करताना, भारताला रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने शानदार सुरुवात दिली. त्यांनी 155 चेंडूत पहिल्या विकेटसाठी 155 धावा जोडल्या. महाराजांनी रोहितला बाद करून ही भागीदारी मोडली. शतकाच्या जवळ पोहोचलेल्या रोहितला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना झेलबाद केले. त्याने 73 चेंडूत 75 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20000 धावाही पूर्ण केल्या.
यशस्वीचं 111 चेंडूत पहिले एकदिवशीय शतक
रोहित बाद झाल्यानंतर, फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली मैदानावर आला. त्याने यशस्वीला चांगली साथ दिली आणि धावगती स्थिर ठेवली. यशस्वीने 111 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला विराट कोहली मोठे फटके मारत होता, त्याने काही उत्कृष्ट षटकार आणि चौकार मारले. त्याने 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने 39.5 षटकांत लक्ष्य गाठले. यशस्वी 116 आणि कोहली 65 धावांवर नाबाद राहिला.
