जेएनएन, मुंबई: Mumbai BMC Elections: BMC निवडणूक जवळ आली असताना ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य युतीमुळे मुंबईतील महाविकास आघाडीचे गणित कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मनसेसोबत जाण्याच्या विरोधात काँग्रेस सुरुवातीपासूनच ठाम आहे.

काँग्रेस नेतृत्वाची स्पष्ट भूमिका अशी की, मनसेशी कोणताही राजकीय तडजोडीचा मार्ग काढला जाणार नाही. त्यामुळे ठाकरे-मनसे जवळ येत असल्याच्या संकेतांनी काँग्रेसची अस्वस्थता वाढली आहे. या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे मात्र मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबई महापालिकेत काँग्रेससोबत जाणे त्यांना गरजेचे वाटते, कारण शिवसेना–काँग्रेस आघाडीचे अनेक वॉर्डांमध्ये मजबूत समीकरण आहे.

माहितीनुसार, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडशी सातत्याने संपर्कात असून मुंबईमध्ये एकत्र लढण्याबाबत तोडगा निघावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र दुसरीकडे, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना नवी ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. “मनसेची साथ सोडा आणि काँग्रेससोबत या” अशी ऑफर काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

या ऑफरमुळे उद्धव ठाकरेची अडचण वाढली आहे.मनसेसोबत युती केल्यास काँग्रेस नाराज होईल, तर काँग्रेससोबत आघाडी केल्यास मनसेबरोबरचे संभाव्य समीकरण बदलेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.ठाकरे बंधूंची युती झाली तर मुंबईत आघाडीचे घोडे नक्कीच अडतील आणि निवडणुकीचे चित्र पूर्ण बदलू शकते अशी शक्यता माविआच्या वर्तवली आहे. मुंबईच्या सत्तेची लढाई अधिक रंजक व गुंतागुंतीची बनली आहे.