मुंबई. कर्जत आणि मुंबई उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बदलापूर–कर्जत दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका उभारण्याच्या 32 किलोमीटरच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी 1,324 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. 

ही मार्गिका उभारल्याने मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता लक्षणीय वाढणार असून सध्या प्रचंड गर्दीने त्रस्त असणाऱ्या मध्य रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. लोकल गाड्यांची फेऱ्यांची संख्या वाढवणे, वेळेचे पालन सुधारणे आणि कर्जत-कसारा विभागातील ताण कमी करणे शक्य होणार आहे. बदलापूर–कर्जत हा मार्ग सध्या प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हींसाठी महत्त्वाचा असल्याने अतिरिक्त दोन मार्गिकांमुळे गाड्यांची वाहतूकक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मुंबई–पुणे प्रवासही होणार वेगवान -

या प्रकल्पाचा मुंबई–पुणे प्रवासावरही सकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या या मार्गावर गाड्यांची मोठी गर्दी असून एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि मालगाड्यांना वेळेत मार्ग मिळण्यात अडथळे निर्माण होतात. नव्या मार्गिकांमुळे हे अडथळे दूर होऊन अधिक वेगवान आणि सुकर रेल्वेसेवा उपलब्ध होईल. मालवाहतुकीला गती मिळाल्यास औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.याशिवाय प्रकल्पामुळे प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधी, रेल्वे कार्यक्षमतेत वाढ, डिझेल खर्चात बचत आणि कार्बन उत्सर्जनात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कर्जत आणि आसपासच्या भागातील रिअल इस्टेट, पर्यटन आणि उद्योग क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे.

बदलापूर–कर्जत तिसरी-चौथी मार्गिका हा प्रकल्प मुंबई उपनगरीय रेल्वेसह मुंबई–पुणे या महत्त्वाच्या मार्गासाठी गेमचेंजर ठरणार आहे.