जेएनएन, मुंबई: भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत पडत आलेल्या तीव्र थंडीपासून आता काहीशी उसंत मिळाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तर भारतातील मैदानी भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ नोंद करण्यात आली आहे.
पर्वतीय भागांवरही हिमवर्षावात घट पाहायला मिळत आहे. या बदलामुळे थंडीचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे.शीतलहरींचा प्रभाव ओसरल्याचे संकेत मिळत आहेत. हिमालयीन पट्ट्यात बर्फवृष्टी कमी झाल्याने, याठिकाणहून वाहणाऱ्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांची दिशा आणि वेग दोन्ही बदलले आहेत. यामुळे मध्य आणि पश्चिम भारतासह महाराष्ट्राच्या तापमानातही अनपेक्षित बदल जाणवत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून रात्रीचे किमान तापमान घट झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.अनेक शहरांमध्ये पारा 10 ते 12 अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र, उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे आता किमान तापमान पुन्हा २ ते ३ अंशांनी वाढताना दिसत आहे. पुणे, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये सकाळी आणि रात्रीची थंडी अद्याप जाणवत आहे.तरी दिवसाचे तापमान वाढत असल्याने वातावरणात गारवा आणि उष्णता जाणवत आहे.देशभरात सध्या धुके आणि धुरक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये दृश्यमानतेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या धुरक्याचे लोंढे हवामानातील बदलांसह महाराष्ट्राच्या काही भागांतही पोहोचत आहेत. नागपूर, अमरावती, मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात सकाळी धुक्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षणात आले आहे.
दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देताना म्हटले आहे की, या तापमानातील सततच्या बदलांमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नागरिक, लहान मुलेसह श्वसनाच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 48 तासांत तापमानात आणखी चढ-उतार होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, धुक्यामुळे सकाळी वाहन चालवताना अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तरेकडील हवामानातील बदलांनी महाराष्ट्रातही वातावरण अस्थिर बनवले आहे. थंडी काहीशी कमी झाली असली तरी तिचा परिणाम पूर्णपणे संपेल असे दिसत नाही.