जेएनएन, पनवेल. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मतदार यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र पनवेलमध्येच निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. पनवेल महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याच नावाची दुबार नोंद सापडल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाली आहे.

एकाच पत्त्यावर तब्बल 268 मतदारांची नावे -

पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रारूप मतदार यादीत हरकती दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस राहिला असतानाच शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मोठा मुद्दा उचलला. एकाच पत्त्यावर तब्बल 268 मतदारांची नावे नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी सार्वजनिक केला. यामुळे मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

विशेष म्हणजे, ज्या पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांच्या देखरेखीखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडते, त्यांच्याच नावाची दुबार नोंद पनवेल महापालिकेच्या प्रारूप यादीत असल्याचे समोर आले आहे. विधानसभा मतदारसंघ 188 मधील यादी क्रमांक 418 आणि 477 या दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव नोंदलेले दिसत आहे. एवढेच नव्हे, तर चांडक यांच्या मुलाचे नाव तर तीन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आढळून आले आहे.

मतदार यादीतील अशा गंभीर त्रुटीमुळे निवडणूक आयोगाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहणे स्वाभाविक आहे. विरोधकांसह स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ सुधारणेची मागणीही केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष ठेवण्यासाठी अशा चुकांवर काटेकोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी विरोधक कडून केली जात आहे.

पनवेलमधील या प्रकारामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादींची पुन्हा सखोल छाननी करण्याकडे प्रशासनाला करावे लागणार आहे.