जेएनएन, मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज वितरित सोमवारपासून सुरुवात झाली आहे.
हे अर्ज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बेलार्ड इस्टेट येथे उपलब्ध असतील. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव यांनी दिली आहे.
अर्ज घेण्याची आणि भरून देण्याची अंतिम तारीख
इच्छुक उमेदवाराने एका वॉर्डासाठी एकच अर्ज भरता येईल. दोन वॉर्डांमधून निवडणूक लढवायची असल्यास प्रत्येक अर्जासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. अर्ज घेण्याची आणि भरून देण्याची अंतिम तारीख शनिवार, दि. 15 नोव्हेंबर 2025, सायं. 7.00 वाजेपर्यंत असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुंबई कार्यालयाचे सचिव नितीन नारायण पाडावे यांचेकडून घेऊन भरावेत, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत अखेर जाहीर करण्यात आली आहे. 227 प्रभागांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला आदी घटकांसाठी किती जागा आरक्षित राहणार याचे सविस्तर तपशील प्रशासनाने जाहीर केले आहेत. या वर्षी, ओबीसींसाठी 61 जागा (27%), एससीसाठी 15 आणि एसटीसाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, प्रत्येक प्रवर्ग पुरुष आणि महिला उमेदवारांमध्ये समान प्रमाणात विभागला गेला आहे.