जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन थरारक अनुभव घेऊन येणारा ‘असंभव’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सिनेप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरला आहे. रहस्य, पुनर्जन्म आणि मानसिक थरार या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सुमारे दोन मिनिटांचा हा ट्रेलर धुक्याने भरलेल्या हवेलीपासून सुरू होतो. भूतकाळातील काही गूढ घटना, अनोळखी सावल्या आणि अनुत्तरित प्रश्न यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. ट्रेलर पाहताना मनात एकच विचार येतो – “नेमकं काय खरं, आणि काय स्वप्न?”

चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये चारही कलाकारांचा अभिनय प्रभावीपणे दिसतो. सचित पाटील यांनी दिग्दर्शन केले असून, पुष्कर श्रोत्री हे सह-दिग्दर्शक आहेत.

हा चित्रपट मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट आणि नितीन प्रकाश वैद्य यांच्या निर्मितीखाली तयार करण्यात आला आहे. रहस्य आणि मनोविश्लेषण या विषयांवर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना एका वेगळ्या मानसिक प्रवासावर घेऊन जाणार आहे, अशी माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

‘असंभव’ हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमधील सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत आणि संवादरचना प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली असून, चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.