जेएनएन, मुंबई: मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लग्नाच्या 13 व्या वाढदिवसानिमित्त हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी पत्नी क्षिती जोगसाठी (Kshitti Jog) सोशल मीडियावर एक भावनिक आणि प्रेमळ पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“पाटलीण बाई तुमच्या सोबत राहून दाढी पांढरी झाली… पण तुमच्यासोबत म्हातारं होण्यात लई मजा आहे… असेच राहूया… एकमेकांसोबत जगूया…” अशा प्रेमळ शब्दांत त्यांनी पत्नीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची ओळख नाट्यसृष्टीतून झाली होती. मैत्रीचे नाते पुढे प्रेमात बदलले आणि 10 डिसेंबर 2012 रोजी दोघे विवाहबद्ध झाले. आजही हे दोघे वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही एकत्र काम करत आहेत. हे जोडपं केवळ अभिनयापुरतंच मर्यादित न राहता व्यावसायिक क्षेत्रातही सक्रिय आहे. चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र प्रोडक्शन कंपनीची सुरुवात केली आहे. त्यांच्या सहकार्याचाच एक भाग म्हणून 2025 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Fussclass Dabhade’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या चित्रपटात अभिनेत्री क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपट देखील नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रिलीज होणार आहे.
मराठी सिनेसृष्टीतील हे लोकप्रिय जोडपे त्यांच्या साधेपणा, सकारात्मक नाते आणि रोमँटिक बाँडमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा “आदर्श सेलिब्रिटी कपल” म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता अमेय वाघने या पोस्ट वर कमेंट करत या जोडप्याला त्याच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अमेयने कमेंटमध्ये लिहिले आहे की, गोरेगाव अन्नछत्र योजनेचे अध्यक्ष आणि खजिनदार ह्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काळा रस्सा शुभेच्छा... हेमंत आणि क्षिती यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा: Marathi Films: 50 मराठी चित्रपटांना राज्य सरकारकडून सन्मान; 15 कोटींचे अर्थसाहाय्य
